कोकणातील गणपतीपुळे समुद्रात संभाजीनगरचे ५ जण बुडाले, बिडकीनवर शोककळा....

Foto
रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे येथे एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. गणपतीपुळे येथे समुद्रात उतरलेले छत्रपती संभाजीनगरमधील ८ पर्यटक समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडाल्याची घटना घडली आहे. यातील ३ जणांना वाचवण्यात यश आले आहे. पण ५ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. आज (शनिवार) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर, बिडकीन   येथून १९ पर्यटक गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आले होते. यातील एकूण ८ जण सकाळी समुद्रात उतरले होते. मात्र, भरती आणि समुद्राच्या पाण्याचा योग्य अंदाज न आल्याने हे सर्वजण पाण्यात वाहून जाऊ लागले.

समुद्रात पर्यटक बुडत असल्याचे लक्षात येताच स्थानिक जीवरक्षक आणि नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. ८ पैकी ३ पर्यटकांना सुखरूपपणे समुद्राबाहेर काढण्यात यश आले आहे. ३ जणांचे प्राण वाचले आहेत. मात्र, उर्वरित ५ जण अद्यापही बेपत्ता आहेत. घटनास्थळी पोलीस व स्थानिक प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले असून शोधमोहीम सुरू आहे. या दुर्घटनेमुळे गणपतीपुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पर्यटकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

युद्धपातळीवर शोधकार्य सुरू
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. बेपत्ता असलेल्या पाचही पर्यटकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक मच्छीमार, जीवरक्षक आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली जात आहे. अद्याप कोणाचाही ठावठिकाणा लागलेला नसून, शोधकार्य वेगाने सुरू आहे. या घटनेमुळे गणपतीपुळे परिसरात आणि पर्यटकांमध्ये खळबळ उडाली आहे. 

बुडालेल्यांची नावे
शासकीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुडालेल्या पाचजणांमध्ये अदित्य संतोष राऊत (२२), अनिकेत बंडु हिवराळे (२०), आनंद राजू नरवडे (२०), प्रेम दिपक आदमाने (१९), यश रामेश्वर कांबळे (१९) यांचा शोध घेण्याचे काम चालू असल्याचे पोलिसांनी सागितले.